बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष शशिधर एस. कोसंबे यांनी शुक्रवारी खडेबाजार पोलीस स्थानकाला अचानक भेट देत बालकांसाठी कार्यरत विशेष पोलीस युनिटच्या कामकाजाची सखोल पाहणी केली. भेटीदरम्यान बालकांशी संबंधित प्रकरणांची नोंद, अहवाल प्रक्रिया आणि आवश्यक फलकांविषयी त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.

बाल न्याय (बालकांचे संरक्षण व संगोपन) अधिनियम २०१५ मधील कलम १०७ तसेच बाल न्याय आदर्श नियम २०१६ मधील नियम ८ (६) आणि ८६ (११) अन्वये पदसिद्ध अधिकाऱ्यांची नावे, पत्ते, दूरध्वनी क्रमांक दर्शविणारा फलक आणि बालसहाय्यता वाणी १०९८ चा कायमस्वरूपी फलक तात्काळ लावावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

बालकांशी संबंधित प्रकरणांचा रजिस्टर व ‘ओपन हाऊस’ कार्यक्रमाची नोंदवही तपासून ती नियमित व अद्ययावत ठेवण्याचे आदेश दिले. बाल अपहरण, पॉक्सो, बालविवाह आदी प्रकरणांची वेळेत, नियमांनुसार आणि स्वाक्षरीसह नोंद करून ठरावीक कालमर्यादेत अहवाल सादर करणे अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस ठाण्यांतील त्रुटींची यादी तयार करून ती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सादर करावी आणि योग्य ती कार्यवाही करण्यासाठी संबंधित एसीपी यांनी पुढाकार घ्यावा, असेही आयोगाध्यक्षांनी निर्देशित केले.

यावेळी बेळगाव शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ बाल पोलीस कल्याण अधिकारी रघु जे. तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी डॉ. परवीन उपस्थित होते.