बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित ‘बहिर्जी ओऊळकर आर्टिस्ट ऑफ द इयर: २०२५-२६’ ही भव्य चित्रकला स्पर्धा आज (गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५) ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे अत्यंत उत्साहात पार पडली.
श्री. बहिर्जी शंभू ओऊळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या स्पर्धेत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या कलागुणांचे प्रभावी प्रदर्शन केले. उद्घाटनप्रसंगी चेअरमन प्रा. आर. के. पाटील यांनी दिपप्रज्वलन केले. प्रो. आर. एस. पाटील, प्रो. नितीन घोरपडे, ज्योती कॉलेजचे प्रा. आनंद पाटील, प्रो. महेश जाधव आणि शालेय मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर उपस्थित होते. गौरी ओऊळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, बेळगांव शहर आणि परिसरातील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या महाविद्यालये आणि शाळेतील एकूण ५२ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून बेळगांवचे आर्टिस्ट मोहन भातकांडे तसेच शिवराज हायस्कूलचे चित्रकला शिक्षक गजानन लोहार यांनी काम पहिले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येने झालेल्या सहभागाने ही स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाली.








