बेळगाव / प्रतिनिधी

पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बडेकोळमठजवळ हिरेबागेवाडी पोलिस स्थानकाच्या हद्दीत हुबळीहून पुण्याकडे निघालेली गोगटे कंपनीची बस उलटून दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. बुधवारी रात्री हिरेबागेवाडी घाटात चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला. मृतांमध्ये महिलेसह एका पुरुषाचा समावेश असून मृत महिलेची ओळख पटविण्यात आली आहे. हिना सलीम शेख मुल्ला (वय ३१ मूळची गदग आणि सध्या रा. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे . तर अन्य एका पुरुष मयताची अद्याप ओळख पटलेली नाही अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

अपघातावेळी या बसमध्ये एकूण १२ प्रवासी होते. अपघातानंतर हिरेबागेवाडी पोलिस स्थानकाचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना वाचवले.अपघातात बस चालक बचावला आहे. बचावलेले प्रवासी तसेच जखमींना त्वरित बेळगाव बीम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे.