- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विठ्ठल चरणी साकडे
- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा
पंढरपूर : राज्याची भरभराट व्हावी आणि शेतकरी सुखी व्हावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल चरणी साकडे घातले.
आषाढी एकादशीनिमित्त लाखो भक्तांच्या उपस्थितीत आज रविवार (दि. ६ जुलै) रोजी पहाटे पंढरपूरच्या विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याहस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली. मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास ही पारंपरिक पूजा पार पडली. यावेळी थेट प्रक्षेपणाद्वारे भक्तांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ घेतला. या पूजेदरम्यान विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी आणलेला खास पोशाख विठ्ठलाला परिधान करून, विठ्ठलाची आरती करण्यात आली.

या वर्षीच्या शासकीय पूजेचा मान मूळचे नाशिक जिल्ह्यातील जातेगावचे असलेले कैलास उगले आणि त्यांच्या पत्नी कल्पना उगले यांना मिळाला. गेल्या १२ वर्षांपासून विठ्ठल भक्तीत लीन असलेल्या उगले दाम्पत्याने पहाटे मंदिरात थेट मुख्यमंत्री दांम्पत्यासोबत विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली. विठ्ठलाच्या महापूजेनंतर मुख्यमंत्री आपले कुटुंब आणि नाशिकमधील मानाचे वारकरी उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. तिथे रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि उगले दाम्पत्यांनी पूजा केली.
पूजेनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचा शाल घालून सन्मान करण्यात आला. मंदिर समितीच्या गहिनीनाथ महाराजांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा सन्मान झाला. यावेळी गहिनीनाथ महाराजांनी आषाढीसाठी वारकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “या मंदिराच्या माध्यमातून पुढील दोनशे वर्षे या मंदिराचं आयुष्य वाढवलं तसं संतपीठ क्षेत्र पंढरपूरी येथे स्थापन करून एक अलौकिक कार्य करावे अशी मी आपल्याला मनापासून विनंती करतो.” त्यांनी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे प्रमुख या नात्याने सर्व वारकरी संप्रदायाच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. वारकरी संप्रदायाला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल सर्वांना सार्थ अभिमान असल्याचे नमूद केले. भविष्यातही असेच खंबीरपणे उभे राहावे अशी विनंती करण्यात आली. पंढरपूर येथे संतपीठ स्थापन करण्याची मागणी हा या भेटीतील महत्त्वाचा मुद्दा ठरला. वारकऱ्यांसाठीच्या सुविधा आणि संतपीठाची मागणी हे प्रमुख विषय होते.
तर मानाचे वारकरी दाम्पत्य कैलास उगले आणि कल्पना उगले यांचा मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्याहस्ते शाल आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारकऱ्यांचा उत्साह आणि श्रद्धा यांचे कौतुक केले. “आषाढी एकादशीच्या मंगलप्रसंगी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी नतमस्तक होण्याचे तसेच शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले आणि विठ्ठल – रुक्मिणीच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले असे त्यांनी सांगितले. “आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या पवित्र दिवशी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन मी सर्वांसाठी प्रार्थना केली आहे. राज्यात भरपूर पाऊस पडो, शेतकरी सुखी आणि समृद्ध होवो आणि महाराष्ट्राचा विकास अखंड सुरू राहो, असे साकडे मी विठुमाऊलीला घातले आहे.” असे ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सौ. अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान आज पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा आनंदोत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने महिनाभर वारी करत चालत असणारे लाखो वारकरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरीत दाखल झाले आहेत. भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी गर्दी केली आहे. यानिमित्ताने संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे.