बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला एक भव्य परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ बेळगाव सीमा भागात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या हर्षोल्सासात आणि उत्साहात साजरा केला जातो. बेळगावच्या भव्य सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा पुढे नेण्याचे काम एका विशिष्ट पूर्ण रीतीने बेळगाव उपनगरातील बॅरिस्टर नाथ पै चौक शहापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केले आहे. यावर्षी बॅरिस्टर नाथ पै चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. त्याचबरोबर याच भागातील सुप्रसिद्ध संगीता स्वीट्स 51 व्या वर्षात पदार्पण करत आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत गुरुवारी सायंकाळी गरिब गरजू वृद्धांना ब्लॅंकेट तर आज शुक्रवारी सकाळी पंडित नेहरू हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले.

यावर्षी बॅरिस्टर नाथ पै चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम यावर्षी हाती घेतले आहेत. सुवर्ण महोत्सवी वर्षात मंडळाने यावर्षी सादर केलेला काशी विश्वनाथाचा भव्य देखावा गणेश भक्तांसाठी निश्चितच आकर्षण ठरत आहे. “नमामी गंगे” या देखाव्यातून वाढत्या जलप्रदूषणावर सामाजिक संदेशही देण्यात आलेला आहे.

सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या वतीने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय आणि मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी रक्तदान शिबिर संपन्न झाले.सामाजिक कार्यकर्त्या सुषमा पाटील यांच्या सहयोगाने काल गुरुवारी वृद्धांना ब्लॅंकेट तर आज शुक्रवारी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे. 

यावेळी हेस्कॉमचे कार्यकारी अभियंते अश्विन शिंदे, शहापूर विभाग हेस्कॉम चे कार्यकारी शिवानंद गलगली, सामाजिक कार्यकर्ते विल्सन वेगस, प्रजापिता ब्रह्माकुमारी शहापूर सेंटरच्या प्रमुख ब्रह्माकुमारी मीनाक्षी बहन, ब्रह्माकुमारी अन्नपूर्णा बहन, पूजा पाटील, शारदा भेकणे तसेच मंडळाचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ब्लॅंकेट आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, उपाध्यक्ष सचिन रंगरेज, कार्याध्यक्ष परशराम घाडी, प्रदीप मजुकर, नागेश शिंदे, सदानंद अरुंदेकर, शंकर चव्हाण, लक्ष्मण छत्र्याण्णावर, अण्णाप्पा मुगळीकर, सदानंद कदम, हिरालाल चव्हाण, यल्लाप्पा बसरीकट्टी, श्रीकांत काकतीकर यांच्यासह अन्य पदाधिकारी,कार्यकर्ते सदस्य उपस्थित होते.