बेळगाव / प्रतिनिधी

शिक्षणाची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी. के. मॉडेल हायस्कूलने शंभर वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला असून, शताब्दी महोत्सव सप्ताहाचा शुभारंभ शुक्रवारी सायंकाळी शाळेच्या मैदानावर हास्य कलाकारांच्या रंगतदार कार्यक्रमाने उत्साहात झाला.

या उद्घाटन सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार, कार्यदर्शी श्रीनिवास शिवणगे, उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी, शैला चाटे, रवी घाडगे, तसेच सुप्रसिद्ध विनोदी कलाकार गंगावती प्राणेश, बसवराज महामुनी आणि शाळेचे माजी विद्यार्थी व हास्य कलाकार मधुकर गुंडेनटी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक श्रीनिवास शिवणगे यांनी केले, तर हास्य कलाकारांचा परिचय तुकाराम भास्कर यांनी करून दिला.

सुप्रसिद्ध विनोदी कलाकार गंगावती प्राणेश यांनी आपल्या खुसखुशीत शैलीतून समाजप्रबोधन करणारे विनोद सादर करत उपस्थितांना मनसोक्त हसविले. बसवराज महामुनी यांनी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील गमतीशीर प्रसंग मांडत प्रेक्षकांना खळखळून हसवले. शाळेचे माजी विद्यार्थी मधुकर गुंडेनटी यांनी स्वतःच्या लेखनावर आधारित विनोदी किस्से सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.

तीनही हास्यवीरांनी जीवनातील विसंगतींवर मार्मिक भाष्य करत श्रोत्यांची मने जिंकली. हास्यांच्या फवाऱ्यात न्हाऊन निघालेल्या या कार्यक्रमामुळे बी.के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाला आनंददायी व संस्मरणीय सुरुवात झाली.