• अविनाश पोतदार यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव एज्युकेशन सोसायटीतर्फे संचलित बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी वर्षानिमित्त येत्या २० ते २६ डिसेंबर २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रमांनी भरलेला भव्य शताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी दिली.

कॅम्प येथील बी. के. मॉडेल हायस्कूलच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पोतदार यांनी शाळेच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. २ फेब्रुवारी १९२५ रोजी ‘मॉडेल इंग्लिश स्कूल’ या नावाने शाळेची स्थापना झाली. पुढे १९४६ मध्ये डी. व्ही. बेळवी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव एज्युकेशन सोसायटीची औपचारिक स्थापना झाली. आज या संस्थेअंतर्गत सात शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत, असे त्यांनी सांगितले.

शताब्दी सोहळ्याची सुरुवात १९ डिसेंबर रोजी सायंकाळी सुप्रसिद्ध विनोदी कलाकार गंगावती प्राणेश यांच्या कार्यक्रमाने होणार आहे. २० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता संस्थेच्या सर्व शाळांतील विद्यार्थी व कर्मचारी सहभागी होणारी भव्य प्रभातफेरी काढण्यात येणार असून सायंकाळी ५.३० वाजता शताब्दी सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन होईल. या कार्यक्रमाला खासदार तेजस्वी सूर्या यांच्यासमवेत खासदार इराण्णा कडाडी उपस्थित राहणार आहेत.

२१ डिसेंबर रोजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला असून, लिंगराज महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य प्रल्हाद जोशी आणि बसवराज जगजंपी प्रमुख पाहुणे असतील. २२ डिसेंबर रोजी अकॅडमी फॉर क्रिएटिव्ह टीचिंगचे अध्यक्ष आणि प्रेरक वक्ते डॉ. गुरुराज करजगी यांचे व्याख्यान होणार आहे.

२३ डिसेंबर रोजी नामवंत शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग असलेला बॉडीबिल्डिंग शो आणि त्यानंतर माजी विद्यार्थ्यांकडून संगीत रजनी सादर केली जाईल. २४ डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, २५ डिसेंबर रोजी दिग्दर्शक व अभिनेते डॉ. गिरीश ओक प्रमुख पाहुणे असतील.

शताब्दी सोहळ्याचा समारोप २६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक नागतिहळ्ळी चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत होणार आहे. या निमित्ताने शाळेच्या मागील बाजूस, बेळगाव लॉज व अशोक पेट्रोल पंप परिसरात वाहनतळाची विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याची माहितीही देण्यात आली.

पत्रकार परिषदेला सोसायटीचे उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी, सचिव श्रीनिवास शिवणगी, संयुक्त सचिव अरविंद हुनगुंद, कृष्णकुमार पै, मुख्याध्यापक सुरेश जोशी आणि माजी मुख्याध्यापिका शैला चाटे उपस्थित होते.