- बुधवारी बेळगावात कलाप्रेमींसाठी पर्वणी ; कार्यक्रम सर्वांसाठी खुला
बेळगाव : येथील प्रतिष्ठित बेळगाव एज्युकेशन सोसायटी संचलित बी.के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते व दिग्दर्शक सचिन पिळगावकर उद्या बुधवार दि. २४ डिसेंबर रोजी बेळगावात येणार आहेत. शाळेच्या भव्य मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
या वेळी सचिन पिळगावकर विद्यार्थ्यांशी व उपस्थितांशी थेट संवाद साधणार असून, अभिनय, दिग्दर्शन, सिनेसृष्टीतील करिअरच्या संधी तसेच मराठी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीवर ते आपले अनुभव कथन करणार आहेत. अभिनयासोबतच दिग्दर्शन व संगीत क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव तरुण पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
बी. के. मॉडेल हायस्कूलला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित सात दिवसीय शताब्दी महोत्सवात विविध नामवंत व्यक्ती सहभागी होत आहेत. सचिन पिळगावकर यांच्यासारख्या अष्टपैलू कलाकाराच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील नवे आयाम समजण्याची संधी मिळेल, असा विश्वास शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमाला बेळगावमधील विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच कलाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे चेअरमन अविनाश पोतदार यांनी केले आहे.
- थोडक्यात परिचय :
सचिन पिळगावकर यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. नवरी मिळे नवऱ्याला, अशी ही बनवाबनवी, एकापेक्षा एक, नवरा माझा नवसाचा, कट्यार काळजात घुसली हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट असून, शोले, सत्ते पे सत्ता, नदिया के पार यांसारख्या हिंदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. अभिनय व दिग्दर्शनासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.








