• विनोदी कलाकार गंगावती प्राणेश यांच्या कार्यक्रमाने उद्घाटन

बेळगाव : शिक्षणाची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी. के. मॉडेल हायस्कूलने शंभर वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली असून, या ऐतिहासिक शताब्दी महोत्सवाला उद्या शुक्रवार, दि. १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता भव्य प्रारंभ होणार आहे.

शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त प्रसिद्ध विनोदी कलाकार गंगावती प्राणेश यांचा बहारदार आणि समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी ही माहिती दिली.

बी. के. मॉडेल हायस्कूलची स्थापना २ फेब्रुवारी १९२५ रोजी सात ध्येयवेड्या तरुण शिक्षकांनी एका भाड्याच्या खोलीत ‘मॉडेल इंग्लिश स्कूल’ म्हणून केली होती. आज ही संस्था वटवृक्षासारखी विस्तारली असून, सात विविध शैक्षणिक शाखांमधून हजारो विद्यार्थी घडविण्याचे कार्य सुरू आहे.

आपल्या खुसखुशीत विनोदशैलीतून जीवनातील विसंगतींवर मार्मिक भाष्य करणारे गंगावती प्राणेश शताब्दी महोत्सवाची नांदी साजरी करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, आजी-माजी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.