बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक सरकारच्या सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षणात मराठा समाजाने योग्य नोंदी कराव्यात यासाठी सकल मराठा समाज वडगाव विभागात जनजागृती बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक गणेश मंदिर, संभाजीनगर येथे पार पडली.

बैठकीत जयराज हलगेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सर्वेक्षणादरम्यान धर्म – हिंदू, जात – मराठा, पोटजात – कुणबी आणि मातृभाषा – मराठी असा स्पष्ट उल्लेख करावा. तसेच सर्वेक्षण फॉर्मातील ६० कॉलमची सविस्तर माहितीही त्यांनी दिली.

समाजसेविका माधुरी जाधव यांनीही आवाहन केले की, मराठा समाजातील बांधवांनी पक्षभेद विसरून एकत्र येत सर्वेक्षणात पोटजात ‘कुणबी’ असा उल्लेख करावा. समाज एकसंध राहिला तरच सामूहिक शक्ती वाढेल, असे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी शिवानी पाटील, प्रतिभा सडेकर, उमेश पाटील, अमोल देसाई यांसह मंगाई भजनी मंडळाच्या अध्यक्षा रेणुका पाटील, उपाध्यक्ष नीता चंदगडकर, खजिनदार विजयालक्ष्मी बगाडे, वैशाली जाधव आदी महिलांची उपस्थिती होती.