- एपीएमसी पोलिसांची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
केएलई रुग्णालयाच्या मागील कर्करोग रुग्णालयासह विविध ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात एपीएमसी पोलिसांनी यश आले आहे. संतोष अंदानी (रा. मूळचा गोकाक ; सध्या राहणार वैभवनगर बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एकूण ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
यामध्ये अंदाजे २,६५,०००/- रुपये किमतीच्या २ हिरो होंडा स्टँडर्ड दुचाकी, ३ होंडा अॅक्टिव्हा , ०१ सीबीझेड एक्सट्रीम, ०१ बजाज पल्सर, ०१ हिरो पॅशन प्रो आणि ०१ बजाज सिटी १०० अशा एकूण ०९ दुचाकींचा समावेश आहे.
शहर पोलिस आयुक्त, उपायुक्त आणि सहाय्यक पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलिस निरीक्षक यू.एस अवटी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करून आरोपीला अटक केली. या प्रकरणात एपीएमसी पोलिस स्थानकाचे एस.आर. मुथत्ती, पीएसआय, एम.ए. पाटील, ए.एस.आय, दीपक सागर, बसवराज नरगुंद, खादरसाब खानम्मनवर आणि पोलिस तांत्रिक विभागातील कर्मचारी रमेश अक्की, महादेव खशीद यांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे. याबद्दल पोलिस आयुक्त आणि उपपोलिस आयुक्त (गुन्हे आणि वाहतूक) बेळगाव शहर यांनी कौतुक व्यक्त केले आहे.