अथणी / वार्ताहर

बस आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील मुरगुंडी गावानजीक अथणी पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. केएसआरटी परिवहन मंडळाच्या विजयपूर आगाराची बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोराची होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

या अपघातात कोल्हापूरहून अफजलपूरला जाणाऱ्या कारमधील चौघांपैकी तिघा जणांचा मृत्यू झाला. तर अथणीहून मिरजला जाणाऱ्या केएसआरटीसी बसमधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. राहुल, गिरीश आणि सांगू तिघेही (रा.अफजलपूर जि. कलबुर्गी) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर जखमींना पुढील उपचारासाठी अथणी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद अथणी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.