- ८ कोटींची रोकड व सुमारे ५० किलो सोने लंपास
- ७-८ दरोडेखोरांकडून कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक
विजयपूर / प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या विजयपूर जिल्ह्यातील चडचण शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मंगळवारी सायंकाळी सुमारे सात वाजता मोठा सशस्त्र दरोडा घालण्यात आला. बुरखाधारी सात ते आठ दरोडेखोरांनी देशी पिस्तुलं व धारदार हत्यारे दाखवत बँकेतील कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधले आणि अंदाजे आठ कोटी रुपयांची रोकड तसेच पन्नास किलोच्या आसपास सोन्याचे दागिने घेऊन पलायन केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, नेमक्या लुटीबाबत अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, चडचण येथील पंढरपूर मुख्य रस्त्यावर वर्दळीच्या भागात असलेल्या एसबीआय शाखेत कर्मचारी दिवसाचे काम संपवून निघण्याच्या तयारीत असताना लष्करी गणवेशातील दरोडेखोरांनी मुख्य दरवाजातून प्रवेश केला. त्यांनी पिस्तुलं व शस्त्रांचा धाक दाखवत व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि लाखोची रोकड व सुमारे पन्नास किलो सोने लंपास केले.
दरोडेखोरांनी चोरीचा माल घेऊन वाहनाद्वारे महाराष्ट्राच्या दिशेने पलायन केले, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. दरोड्याची बातमी समजताच मोठ्या संख्येने नागरिक बँकेपुढे जमले. पोलीस तपासाला गती देण्यात आली असून राज्य व सीमेवर गस्त वाढवण्यात आली आहे.