- सहा आरोपी अटकेत : १९ हजारांहून अधिक रक्कम जप्त
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील एपीएमसी मार्केट परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका जुगार अड्ड्यांवर एपीएमसी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा फटका दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी मटका खेळणाऱ्या आणि खेळवून घेणाऱ्या अड्ड्यांवर टाकलेल्या छाप्यात सहा जणांना अटक करण्यात आली असून, १९ हजार ६०२ रुपयांची रोख रक्कम व मटका साहित्य जप्त करण्यात आले आहे.
६ जानेवारी २०२६ रोजी एपीएमसी मार्केट यार्डजवळ सुरू असलेल्या जुगारप्रकरणी एएसआय जी. एल. कोटबागी आणि त्यांच्या पथकाने विनायक कोलकार (वय १९) याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून १ हजार रुपये रोख व जुगाराशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले.
याचवेळी पीएसआय एस. आर. मुत्तट्टी आणि त्यांच्या पथकाने स्वतंत्र कारवाई करत किरण भजंत्री (२७), मारुती रजायी (३१), शुभम कडीमनी (२७), अनूप कांगरा (४७) आणि विनायक सोनारवाडी (४१) या पाच जणांना अटक केली. या आरोपींकडून १८ हजार ६०२ रुपये रोख आणि मटका साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
या दोन्ही कारवायांत एकूण १९ हजार ६०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सहाही आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीने कारवाई केल्याबद्दल बेळगावचे पोलीस आयुक्त व उपायुक्त यांनी संबंधित पीएसआय, एएसआय आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे.








