बेळगाव / प्रतिनिधी

गेल्या ३४ वर्षांपासून शरीरसौष्ठव क्षेत्रात स्पर्धक, राष्ट्रीय पंच तसेच कार्यकर्ता म्हणून सातत्याने योगदान देणारे अनिल गुरुनाथ अंबरोळे यांची नुकतीच भारतीय बॉडी बिल्डिंग फेडरेशन (IBBF) च्या सदस्यपदी निवड झाली. आयबीबीएफचे सचिव सुरेश कदम यांनी त्यांना सदस्यत्वाचे प्रमाणपत्र प्रदान केले.

ही नियुक्ती बेळगावच्या शरीरसौष्ठव क्षेत्रासाठी नवी ऊर्जा देणारी ठरणार आहे. १९८९-९० पासून मनपा व्यायामशाळेत सराव सुरू केलेल्या अंबरोळे यांनी १९९६ पर्यंत जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेतला. २०१४ मध्ये त्यांची राष्ट्रीय पंच म्हणून निवड झाली.

१९९६ मध्ये स्थापन झालेल्या बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेत कार्यरत राहिल्यानंतर त्यांनी ‘नूतन बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व स्पोर्ट्स’ ही स्वतंत्र संघटना उभी करून संस्थापक अध्यक्षपद स्वीकारले. तसेच मनपा व्यायामशाळेचे अध्यक्षपद मागील दीड वर्षांपासून ते सांभाळत आहेत.

राज्याध्यक्ष डॉ. संजय सुंठकर, जिल्हाध्यक्ष महेश सातपुते, गौरवाध्यक्ष मिहीर पोतदार, राष्ट्रीय पंच राजेश लोहार, नारायण चौगुले आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने अंबरोळे यांनी बेळगावातील सर्वसामान्य शरीरसौष्ठव खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.