आंबोली / वार्ताहर
आंबोली कावळेसाद पॉईट येथील दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील राजेंद्र सनगर (४५) या पर्यटकाचा मृतदेह सापडला असून आज एनडीआरएफ टीम तसेच रेस्क्यू पथक, सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दीडशे फूट खोल दरीतून हा मृतदेह काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आणि आला. कोल्हापूर येथून आंबोली येथील वर्षा पर्यटनासाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी आले होते. यावेळी सायंकाळी ते कावळेसाद पॉईंट येथे गेले असता राजेंद्र सनगर हे फोटो काढीत असताना खोल दरीत कोसळले. अखेर अथक प्रयत्नानंतर सनगर यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मूळचे पन्हाळा तालुक्यातील माले येथील सध्या राहणार, चिले कॉलनी येथील राहणारे राजेंद्र बाळासो सनगर, हे त्यांच्या १४ सहकाऱ्यांसोबत आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. कावळेसाद पॉईट येथे रोलिंगजवळ उभे असताना त्यांचा पाय अचानक घसरल्याने ते दरीत कोसळले. लागलीच गेळे गावचे सरपंच सागर ढोकरे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.