• पोलीस आयुक्तांचा आदेश

बेळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बेळगाव शहर आणि तालुक्यात मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली असून उद्या संपूर्ण परिसरात ‘ड्राय डे’ पाळला जाणार आहे.

संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी बेळगावमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाने कडक उपाययोजना केल्या आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी कर्नाटक अबकारी कायदा आणि पोलीस कायद्यातील अधिकारांचा वापर करून ‘ड्राय डे’चा आदेश जारी केला आहे.

दि.  १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६  वा. पासून ते मध्यरात्री १२ वा. पर्यंत बेळगाव शहर व तालुक्यातील सर्व देशी-विदेशी मद्याची दुकाने, वाईन शॉप, बार, रेस्टॉरंट आणि क्लब बंद राहणार आहेत. तसेच केएसबीसीएल डेपोमधून होणारा मद्यपुरवठाही स्थगित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या कालावधीत मद्याची विक्री किंवा वाहतूक करताना कोणी आढळल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे. सार्वजनिक शांतता आणि उत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.