बेळगाव / प्रतिनिधी

देशातील भाषा आणि संस्कृती हा आपला अभिमान असून नागरिकांचे मूलभूत अधिकार डावलले गेले, तर देशाची एकात्मता टिकणार नाही. त्यामुळे सर्वसमावेशक हिताचा विचार करणे आवश्यक आहे, असे ठाम प्रतिपादन अखिल भारतीय आयटक कामगार संघटनेच्या महासचिव अमरजित कौर (नवी दिल्ली) यांनी केले.

मराठा मंदिर, खानापूर रोड (रेल्वे उड्डाणपुलाजवळ) येथे मंगळवारी आयोजित कृष्णा मेणसे पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी सांगितले की, देशात मोठ्या प्रमाणावर तरुण बेरोजगारी आहे तसेच अनेक गंभीर प्रश्न देशासमोर उभे आहेत. कोरोनानंतर केवळ मोजक्या लोकांच्या संपत्तीत वाढ झाली असून, अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला संघर्षाचा मार्ग स्वीकारावा लागेल. कृष्णा मेणसे हे निर्भय व निडर नेतृत्व होते. विविध विचारधारांचे लोक त्यांना मानत होते, यावरून त्यांच्या कार्याचे महत्त्व स्पष्ट होते, असेही अमरजित कौर यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात अमरजित कौर आणि कुस्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भालचंद्र कांगो यांना ‘कृष्णा मेणसे पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर, भालचंद्र कांगो, अॅड. नागेश सातेरी, मास्ती घाडी, प्रकाश मरगाळे, सुभाष ओऊळकर, समाजसेवक शिवाजी कागणीकर, मेघा सामंत यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.