बेळगाव : बेळगावमधील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने (विशेष पॉक्सो न्यायालय-१) एका अल्पवयीन मुलीवर सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी आरोपी शिवानंद बसवराज डोणी याला ३० वर्षांच्या कठीण कारावासाची शिक्षा आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गोकाक तालुक्यातील लोळसूर येथील रहिवासी शिवानंद डोणीने पीडितेला विवाहाचे आमिष दाखवून अपहरण केले आणि बळ्ळारीसह विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर सातत्याने अत्याचार केला. या काळात पीडितेच्या दागिन्यांची विक्री करून तो पैसा स्वतःसाठी खर्च केला. घटप्रभा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक एच. डी. मुल्ला यांनी तपास करून विशेष पॉक्सो न्यायालयासमोर दोषारोपपत्र सादर केले.
सुनावणीदरम्यान १८ साक्षीदार, ५० कागदपत्रे आणि ३ वस्तूंचा आधार घेत आरोपीवर आरोप सिद्ध झाला. न्यायाधीश सी. एम. पुष्पलतांनी आरोपीला पॉक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत ३० वर्षांची कठीण कारावासाची शिक्षा ठोठावली, तसेच १ लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी २ वर्षांची शिक्षा भोगावी लागेल, असेही निकालात नमूद करण्यात आले.
याशिवाय न्यायालयाने पीडित मुलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ४ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत ५ वर्षांसाठी मुदत ठेवीत ठेवावी, असेही निर्देश करण्यात आले. या प्रकरणात विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद केला.







