बेळगाव / प्रतिनिधी

‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ नामफलक प्रकरणातील सात पैकी प्रलंबित चार खटल्यांमधील १२५ /२०१५ क्रमांकाच्या गुन्ह्यातील सर्व ४२ आरोपींची आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ नामफलक प्रकरणातील खटल्यांमध्ये एकूण ४२ आरोपी आहेत, त्यापैकी ७ जणांना वगळण्यात आले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या ३२ आरोपींविरुद्ध खटला सुरू आहे. ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ नामफलकाशी संबंधित एकूण सात खटले दाखल करण्यात आले होते, त्यापैकी तीन खटल्यांचा निकाल यापूर्वीच लागला आहे. उर्वरित चार खटल्यांचे कामकाज आता अंतिम टप्प्यात आले आहे.

त्या अनुषंगाने चार खटल्यांपैकी १२५ / २०१५ क्रमांकाच्या गुन्ह्यासंदर्भात आज गुरुवारी सुनावणी होऊन न्यायालयाने संबंधित सर्व ४२ आरोपींची साक्षीदारांमधील विसंगती व सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्या बाजूने ॲड. श्यामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नावर आणि ॲड. श्याम पाटील हे कामकाज पाहत आहेत. न्यायालयाने निकाल जाहीर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ॲड. श्यामसुंदर पत्तार यांनी ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा नामफलक हटवल्यामुळे २७ मे २०१४ मध्ये येळ्ळूरवासियांच्या संतापाचा उद्रेक झाला होता. त्यावेळी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीस कारणीभूत ठरवून सुमारे २५० ते ३०० ग्रामस्थांवर पोलिसांनी ७ गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी या १२५ / २०१५ क्रमांकाच्या सीपीआय मुरुळ सिद्धाप्पा यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील ४२ आरोपींची आज गुरुवारी न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

या पद्धतीने एकूण ७ खटल्यांपैकी ४ खटल्यांमध्ये येळ्ळूरवासियांची निर्दोष मुक्तता झाली आहे असे सांगून अद्याप तीन खटले प्रलंबित असून सर्वांच्या सहकार्याने त्या खटल्यातील आरोपींना देखील निर्दोष साबित केले जाईल, असा विश्वास ॲड. श्यामसुंदर पत्तार यांनी व्यक्त केला.