बेळगाव / प्रतिनिधी
अगरबत्ती पॅकिंगच्या गृहोद्योगाच्या नावाखाली शेकडो महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणातील प्रमुख आरोपीला बेळगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, त्यामुळे त्याची कारागृहात रवानगी न होता थेट सुटका झाली आहे.
जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर (वय ३५, रहिवासी पंढरपूर) असे आहे. ‘बी. एम. ग्रुप महिला गृहोद्योग समूह’ या नावाने महिलांना घरबसल्या अगरबत्ती पॅकिंगचे काम मिळेल असे सांगून त्याने मोठ्या प्रमाणात पैसा गोळा केला होता.
ओळखपत्रासाठी प्रत्येक महिलेकडून २,५०० रुपये घेऊन त्याने मोठी रक्कम जमा केली. कामानंतर ३,००० रुपये वेतन देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र प्रत्यक्षात ना पगार दिला, ना परतावा. या फसवणुकीसंबंधी खासबाग-शहापूर येथील लक्ष्मी आनंद कांबळे यांनी २५ ऑक्टोबर रोजी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
यानंतर शहापूर पोलिसांनी ४ नोव्हेंबर २०२५ रोजी कोळेकरला ताब्यात घेतले. त्याच्यावर कलम ३१६ आणि ३१८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेनंतर त्याने तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज केला व त्यावर सुनावणी होऊन तात्पुरता दिलासा मिळाला. पुढे ६ नोव्हेंबर रोजी मुख्य जामीन अर्जावरही सुनावणी झाली आणि न्यायालयाने कायम जामीन मंजूर केला.
यामुळे अटक असूनही त्याची तुरुंगात रवानगी टळली. आरोपीची बाजू वकील प्रताप यादव, हेमराज बेंचन्नावर आणि स्वप्नील नाईक यांनी न्यायालयात मांडली. तृतीय प्रथमवर्गीय न्यायालयाने जामीन अर्जाला मंजुरी दिली.








