- पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे महापालिकेला पत्र
- विसर्जन व्यवस्थेबाबत प्रशासनात हालचालींना वेग
बेळगाव / प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश विसर्जन व्यवस्थेबाबत प्रशासनात हालचालींना वेग आला आहे. बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून प्रमुख विसर्जन स्थळांची खोली वाढविणे व त्यांचे विस्तारीकरण तातडीने करण्याची मागणी केली आहे.
शहरात दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढत असून भव्य मूर्तींची उंची आणि आकारही वाढत आहेत. मात्र त्या मानाने विसर्जन तलावांची क्षमता मर्यादित असल्याने विसर्जन प्रक्रियेत मोठा विलंब होतो. परिणामी वाहतूक कोंडी, गर्दी आणि सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात.
गेल्या काही वर्षांपासून विसर्जनाच्या दिवशी तलावांची अपुरी खोली व रुंदी ही समस्या ठरत आली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रशासनाची धावपळ सुरू होते; मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी पाठविलेले पत्र महत्त्वपूर्ण मानले जात आहे. महापालिकेने याची तातडीने दखल घेऊन विसर्जन तलावांचे खोलीकरण व विस्तारीकरण आत्तापासूनच हाती घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








