बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावात घडलेल्या विद्यार्थिनीशी लगट प्रकरणातील त्या मुख्याध्यापकाविरोधात पोलिसांनी सुओ मोटो गुन्हा दाखल करुन घेतला आहे. यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु केला असून संबंधित मुख्याध्यापकाला पोलिस स्थानकाने नोटीस बजावली आहे. याचा सखोल तपास व पुरावे जमा केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. चार दिवसांपूर्वी १२ डिसेंबर रोजी बेळगाव तालुक्यात मुख्याध्यापकाडून विद्यार्थिनीशी लगटप्रकरण समोर आले. या मुख्याध्यापकावर कडक कारवाई करावी, असे म्हणत ग्रामस्थ त्या दिवशी संतप्त बनले होते. पोलिस आयुक्तांसह अन्य पोलिस अधिकारी, बालकल्याण खात्याची समिती , शिक्षण खात्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी गेले होते. तेव्हा पोलिसांनी याबाबत तक्रार देण्याची विनंती केली. परंतु, संबंधित विद्यार्थिनी अथवा तिचे पालक फिर्याद देण्यास पुढे आले नाहीत. बालकल्याण समितीनेही तेव्हा फिर्याद दिली नाही. आम्ही तपशील घेऊन सांगतो, असे सांगून समिती निघून गेली. दुसऱ्या दिवशी शनिवारीही त्यांनी फिर्याद दिली नाही.
या घटनेची अधिकच चर्चा सुरु झाली शिवाय याला राजकीय वळण लागून प्रकरण अधिवेशनापर्यंत जाऊ नये, यासाठी रविवारी पोलिसांनी स्वतःहून अर्थात सुओ मोटो एफआयआर दाखल करून घेतला. सदर स्थानकातील एका महिला कॉन्स्टेबलकडून फिर्याद लिहून घेत बालअत्याचार प्रकरणांतर्गत एफआयर दाखल करुन घेतला आहे. याचा तपास एका एसीपीकडे सोपविण्यात आला आहे. अधिवेशनाच्या धांदलीतच याचा तपास देखील सुरू झाला असून संबंधित मुख्याध्यापकाला सोमवारी नोटीस बजावण्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सदर घटनेसंबंधी पुरावे जमा केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.







