- शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय
- अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी होणार आयोजन
बेळगाव / प्रतिनिधी
विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी ८ डिसेंबरपासून सुवर्णसौध येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे भव्य महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. १ नोव्हेंबर रोजी काळा दिनाची फेरी यशस्वी झाल्यानंतर महामेळाव्याबाबत व्यापक बैठक घेऊन जनजागृतीला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
रविवारी (दि. २६ ऑक्टोबर) रामलिंगखिंड गल्लीतील रंगुबाई भोसले पॅलेस येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहर म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
बैठकीत बोलताना मरगाळे म्हणाले की, महाराष्ट्र–कर्नाटक सीमावाद अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही कर्नाटक सरकार दरवर्षी बेळगावमध्ये अधिवेशन भरवत आहे, जे पूर्णतः बेकायदेशीर आहे. त्यामुळे यावर्षी देखील या अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला जाणार आहे. त्यांनी सांगितले की, आजपर्यंत सोळा महामेळावे पार पडले असून, २०१७ पर्यंत परवानगी सशर्त मिळत होती. मात्र त्यानंतर ती नाकारली गेली. तरी देखील समितीने विविध मागण्यांद्वारे या अधिवेशनास विरोध सुरूच ठेवला आहे.
मरगाळे यांनी पुढे सांगितले की, सीमाभागातील मराठी भाषिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटना वाढल्या आहेत. या संदर्भात महाराष्ट्राचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारकडे तक्रार दाखल करण्यासाठी पुरावे गोळा करण्याचे सुचवले आहे. त्यानुसार पोलिसांकडून नोंद झालेल्या प्रकरणांची माहिती संकलित करून ती केंद्रातील मंत्र्यांना व विरोधी पक्षांना पाठविण्यात येणार आहे.
यावेळी नेताजी जाधव यांनी सांगितले की, मराठी कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचे प्रकार सुरू असून, या अन्यायाविरुद्ध सर्व मराठी बांधवांनी एकत्र येऊन भव्य फेरी काढून निषेध नोंदवावा.
बैठकीला रमाकांत कोंडुसकर, रणजीत चव्हाण पाटील, मदन बामणे, अंकुश केसरकर, ॲड. अमर येळ्ळूरकर, सागर पाटील, रणजीत हावळाण्णाचे, श्रीकांत कदम, शिवराज पाटील, सचिन केळवेकर, प्रकाश नेसरकर, श्रीकांत मांडेकर, संतोष कृष्णाचे, साईनाथ शिरोडकर, ज्ञानेश्वर मन्नुरकर, उमेश पाटील, आकाश भेकणे, बाबू कोले, अनिल अमरोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
- काळा दिन फेरीसाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी यावे :
सध्या महाराष्ट्र एकीकरण समिती काळ्या दिनी आयोजित केली जाणारी निषेध फेरी आणि सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असून, काळा दिनाच्या फेरीला महाराष्ट्रातील नेतेमंडळींनी उपस्थित राहावे, यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच निषेध फेरीच्या माध्यमातून पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या विरोधात एकवटण्याचा निर्धार प्रत्येक गावागावांतून केला जात आहे.
- मालोजी अष्टेकर, सरचिटणीस, महाराष्ट्र एकीकरण समिती
मराठी भाषिकांना डिवचण्यासाठीच बेळगाव येथे २०१३ पासून कर्नाटक सरकार अधिवेशन घेत आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पहिल्या अधिवेशनापासून महामेळावा घेतला जातो. कर्नाटक सरकारकडून अधिवेशनाची तारीख अंतिम होताच मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मेळाव्याची जनजागृती केली जाईल. सध्या कार्यकर्त्यांनी ‘काळा दिन’ यशस्वी करण्यासाठी समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अधिक प्रमाणात जनजागृती करावी. नोव्हेंबर महिन्यात अधिवेशनाची अंतिम तारीख बघून पुढील रूपरेषा ठरविली जाईल.








