बेळगाव / प्रतिनिधी

हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी टोलनाक्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी कायदा व सुव्यवस्था विभागाचे एडीजीपी हितेंद्र आर शुक्रवारी बेळगावात दाखल झाले. केएलई रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची त्यांनी प्रकृतीची चौकशी केली आणि त्यांना धीर दिला.

एडीजीपींनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या घटनेत एकूण ११ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. वातावरण शांत राहावे अशी अपेक्षा असतानाही ही अप्रिय घटना घडली, असे ते म्हणाले. घटनेचा तपास वेगाने सुरू असून, घटनास्थळावर स्थापित असलेल्या सुमारे ४० ते ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासली जात आहेत.

यासंदर्भात यमकनमर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. “शेतकऱ्यांना शांत करण्याचेच आमचे प्रयत्न होते, मारहाण करण्याचे आदेश कुणालाही दिलेले नाहीत,” असेही त्यांनी स्पष्ट केले. ते स्वतः घटनास्थळाची पाहणी करणार असून, उपलब्ध व्हिडिओंच्या आधारे पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.

दगडफेकीदरम्यान १० पेक्षा जास्त वाहनांचे, त्यात ४-५ शासकीय वाहनांचादेखील, नुकसानीचा अंदाज आहे. अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आले नसल्याची माहितीही एडीजीपींनी दिली.

या भेटीदरम्यान आयजीपी चेतनसिंग राठोड, शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद आणि पोलिस विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते.