बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात अलिकडच्या काळात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये काळात वाढ होत असताना,बेळगाव शहर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी अजय उर्फ अजित बसवराज भजंत्री (वय १९) या तरुणाला अटक करून त्याच्याकडून सुमारे २.७० लाख रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या.
ही कारवाई पोलीस आयुक्त भूषण बोरसे, उपायुक्त नारायण बरमनी, निरंजन राजे अरस तसेच ग्रामीण उपविभागाचे एसीपी बी. एम. गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक एस. के. होलेनावर यांच्या पथकाने २० नोव्हेंबर २०२५ रोजी संशयास्पदरीत्या दुचाकीसह फिरणाऱ्या अजयला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीची पडताळणी केली असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.
चौकशीदरम्यान आरोपीने अल्लावर, विष्णू लॉज परिसर, धारवाड नवीन बस स्थानक आणि कित्तूर चन्नम्मा सर्कल परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये हिरो स्प्लेंडर प्लस (किंमत रु.४५,०००/-), हिरो एचएफ डिलक्स (किंमत रु.१५,०००/-), बजाज डिस्कव्हर (किंमत रु. ७५,०००/-) आणि हिरो स्टँडर्ड प्लस (किंमत रु.७५,०००/-) या दुचाकींचा समावेश असून त्यांची एकूण किंमत अंदाजे रु. २,७०,०००/- इतकी आहे.
ही कारवाई निरीक्षक एस. के. होलेनावर, पीएसआय अविनाश यरगोप्प, बी. के. मिटगार आणि कर्मचारी एम. आय. तुरमुरी, गुरुसिद्ध पूजारी, एम. जी. माणिकबाग, महांतेश कदनावर व आर. एस. कनिमनी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून शक्य झाली. शहर पोलीस आयुक्तांनी संपूर्ण टीमच्या कौतुकास्पद भूमिकेची दखल घेत त्यांचे अभिनंदन केले आहे.








