बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावमध्ये कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केल्यानंतर अटक केलेल्या ३३ आरोपींना शुक्रवारी तिसऱ्या जेएमएफसी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बॉक्साईट रोडवरील एका खाजगी इमारतीत हे अवैध कॉल सेंटर ८ मार्च २०२५ पासून सुरू होते. येथे उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ यांसारख्या राज्यांतून आलेले ३३ युवक कार्यरत होते.
हे सर्वजण अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करून ऑनलाइन गुंतवणूक, ट्रेडिंग आणि इतर आमिषे दाखवून फसवणूक करत होते, असा आरोप पोलिसांनी केला आहे. छाप्यात ३७ लॅपटॉप, ३७ मोबाईल फोन, ३ वायफाय राऊटर आणि इतर डिजिटल पुरावे पोलिसांनी जप्त केले असून तपास सुरू आहे.
तपास अधिक गतीमान करण्यासाठी सीआयडीची मदत घेतली जाणार असून, आवश्यक असल्यास इंटरपोलशीही संपर्क साधला जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.








