बेळगाव : येथील आर्यन्स फन स्कूलच्या सदाशिवनगर शाखेत तरुण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असलेला सिनियर केजीच्या मुलांचा ग्रॅज्युएशन डे उत्साहात साजरा करण्यात आला. सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत असताना मिळवलेल्या त्यांच्या प्रतिभा आणि कौशल्यांचे प्रदर्शन करणाऱ्या मनमोहक सादरीकरणाने समारंभाची सुरुवात झाली.

यामध्ये मुलांनी आपला प्री प्रायमरीचा अनुभव सांगणारे छोटेसे नाट्य तसेच एक गीत सादर केले. यामुळे पालकांना विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि आत्मविश्वास अधोरेखित करणारे सादरीकरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रमाणपत्र वितरण समारंभ, जिथे सिनियर केजीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या पायाभूत वर्षाच्या यशस्वी पूर्ततेचे प्रतीक प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ. सरोजा सदलगे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल आणि समृद्ध भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पालकांचे आभार मानून भविष्यात अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी मुलांनी ग्रॅज्युएशनच्या टोप्या उडवून आनंद द्विगुणित केला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या पूर्व प्राथमिक वर्गाच्या शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा प्रशिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पालक बहुसंख्येने उपस्थित होते.








