बेळगाव / प्रतिनिधी

छत्रपती शिवरायांच्या काळातील युद्ध कलेच्या मार्गदर्शनाचे धडे वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी घेतले. शिवजयंतीच्या निमित्ताने आधार एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि बामणे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांच्या वतीने गुरुवारी शिवजयंतीचा सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना युद्धकलेतील शानदार कौशल्याचे अनुभव आणि मार्गदर्शन मिळाले.

प्राचार्य डॉ. डी. टी. बामणे, उपप्राचार्य डॉ. एम. एम. साणिकोप यांच्यासह संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. पूजा बामणे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुहास पाटील, डॉ. अभिषेक बामणे, डॉ. अरुण जाधव यांच्यासह निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थ्यांनी शिवरायांचा जन्म सोहळा साजरा करून शानदार पालखी काढली. यामध्ये कॉलेजचे विद्यार्थी पारंपारिक वेशभूषा करून सहभागी झाले होते. संस्थेच्या सभागृहामध्ये शिवमुर्तीचे पूजन करून आरती करण्यात आली. सव्यसाची गुरुकुल चक्रपाणि युद्धकला प्रशिक्षण केंद्र मच्छे यांच्या वतीने शिवरायांच्या युद्ध कलेतील कौशल्य दर्शविणारे प्रात्यक्षिक सादर झाले. सचिन चोपडे आणि साक्षी तुकाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. बाल युवा वर्गासह भाग घेतला होता. संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. शिवजयंतीच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. यामध्ये डॉ. अरुण जाधव आणि मलप्रभा राजाई यांनी आपले विचार व्यक्त केले. तर शुभांगी दिवटे पाटील यांनी पोवाडा गायन करून उपस्थितांची मने जिंकली. प्रथम वर्ष विद्यार्थिनींनी नृत्याविष्कार सादर केला. आणि विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग बहुसंख्येने सहभागी झाले होते.