• ९५ लाखांची चोरीची २१ वाहने जप्त : पाच जणांना अटक
  • मारिहाळ पोलिसांची कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी

मारिहाळ पोलिसांनी आंतरराज्य तसेच आंतरजिल्हा स्तरावर सक्रिय असलेल्या वाहनचोरीच्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल २१ चोरीची वाहने जप्त करण्यात आली असून त्यांची अंदाजे किंमत सुमारे ९५.५० लाख रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.

२७ नोव्हेंबर २०२५ रोजी मारिहाळ पोलिस ठाणे हद्दीतील निलजी क्रॉस परिसरात एका घरासमोर उभी असलेली अशोक लेलैंड कंपनीची मिनी गुड्स ट्रक चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी मारिहाळ पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४४/२०२५ अंतर्गत BNS २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी विशेष पथक तयार करून विविध ठिकाणी माहिती गोळा केली. यावेळी आरोपी रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रथम रॉयल एनफिल्ड मोटारसायकल किंवा सुझुकी ॲक्सेस स्कूटर चोरी करत असल्याचे उघड झाले. त्यानंतर या वाहनांचा वापर करून अशोक लेलैंड मिनी गुड्स वाहनांची चोरी केली जात होती. चोरीची वाहने पुढे इतर व्यक्तींना विक्रीस काढल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणी पोलिसांनी युसुफखान सिकंदर खान (वय ६८) व जाकीर हुसेन मोहम्मदसाब परदेवाले (वय ४७, दोघेही रा. धारवाड), आजाद इब्राहिम मुतवली (वय ३६, रा. विजापूर), शफीक अहमद रफीक अहमद (वय ५२, रा. वेल्लूर, तामिळनाडू) आणि बसिर अहमद मकानदार (वय ३८, रा. दांडेली) या पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

आरोपींकडून पोलिसांनी अशोक लेलैंड मिनी गुड्स ट्रक ८, रॉयल एनफिल्ड मोटारसायकली ५, सुझुकी ॲक्सेस स्कूटर ५, हिरो स्प्लेंडर मोटारसायकली २ आणि होंडा डिओ स्कूटर १ अशी एकूण २१ वाहने जप्त केली आहेत. या वाहनांपैकी काहींची चोरी बेळगाव, तुमकूर, दावणगेरे तसेच महाराष्ट्रातील पुणे आणि सांगली परिसरातून झाल्याचे तपासात समोर आले आहे.

ही कारवाई बेळगाव ग्रामीण उपविभागाचे एसीपी गंगाधर बी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली मारिहाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक आय. आर. पट्टणशेट्टी, पीएसआय मंजनाथ तुलकुद, चंद्रशेखर तसेच सीसीबी आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. पोलिस आयुक्तांनी या पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.