बेळगाव / प्रतिनिधी

काकती येथील एक आजारी वृद्ध जिल्हा रुग्णालयातून उपचार करून घरी परतताना अचानक तोल जाऊन रस्त्यावर पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला. बेळगावातील किल्ला तलावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली. गणपती पाटील (वय ६५ रा. काकती, ता. बेळगाव) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

शुक्रवारी रात्री बेळगाव शहरातील किल्ला तलावाजवळ हा प्रकार घडल्याची माहिती आहे. गणपती पाटील काही महिन्यांपासून आजारी होते आणि उपचारांसाठी नियमितपणे बेळगाव जिल्हा रुग्णालयात जात होते. शुक्रवारीही ते उपचारांसाठी रुग्णालयात गेले होते आणि त्यानंतर घरी परतत असताना हा अपघात घडला.

रात्री किल्ला तलावाजवळील रस्त्यावर चालताना त्यांचा अचानक तोल गेला आणि पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे ते जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी सकाळी पोलिसांच्या निदर्शनास आली. मार्केट पोलीस स्थानकाचे अधिकारी घटनास्थळी तातडीने पोहोचले आणि त्यांनी पाहणी सुरू केली. सध्या या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.