बेळगाव / प्रतिनिधी

मराठी विद्यानिकेतन शाळेच्या व आदर्श विद्यामंदिर शाळेच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने बेळगाव शहर तालुकास्तरीय मुला मुलींच्या खो-खो स्पर्धा घेण्यात आल्या. मराठी विद्यानिकेतन शाळेने तिहेरी मुकुट संपादन केला आहे. मराठी विद्यानिकेतन शाळेच्या मैदानावर झालेल्या माध्यमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत मराठी विद्यानिकेतन शाळेने गोमटेश विद्यापीठ शाळेचा ६ गुणांनी पराभव केला. मुलींच्या गटातील अंतिम लढतीत मराठी विद्यानिकेतन शाळेने गोमटेश विद्यापीठ शाळेचा ५ गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकाविले.

प्राथमिक गटातील मुलींच्या अंतिम लढतीत मराठी विद्यानिकेतन शाळेने जेल शाळा वडगावचा ४ मिनिटे राखून पराभव करीत विजेतेपद पटकाविले आहे. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विद्यानिकेतन शाळेचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, विठ्ठल पाटील, जनार्दन पाटील, भरमा तुपारे, शिवकुमार सुंकद, महेश कुंभार, उमेश बेळगुंदकर, बाळकृष्ण धामणेकर, अनिल जनगौडा, श्रीधर बेत्राळकर, महेश हगीदळी, दत्ता पाटील आदि मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.