बेळगाव / प्रतिनिधी

आठ – दहावेळा विसर्जन मार्गाची पाहणी केल्यानंतर महापालिका शहरातील गणेशमूर्ती विसर्जन सुरळीत पार पडावे, यासाठी प्रयत्न करत आहे. शहरातील ९ विसर्जन तलावांत गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. विसर्जनावेळी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी चोवीस तास तत्पर असणार आहेत. गणेश विसर्जन काळात कचरा समस्या निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका आरोग्य स्थायी समितीची विशेष बैठक घेण्यात आली आहे.

याआधीही गणेशोत्सवासाठी महापालिकेत विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. आता विसर्जन केवळ काही तासांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे, बेळगावची ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी महापालिकेनेही कंबर कसली आहे. महापालिकेच्या आरोग्य, बांधकाम, महसूल आणि इतर विभागाच्या सर्वच कर्मचाऱ्यांना कामे नेमून देण्यात आली आहेत. महापालिकेला पोलिस, हेस्कॉम, पाणीपुरवठा मंडळ आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱ्यांची साथ लाभणार आहे. महापालिकेने विसर्जनासाठी तलावांवर १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्याठिकाणी मूर्ती विसर्जनाला मदत करणे, आवश्यक खबरदारी घेणे, लोकांना सूचना करणे, स्वच्छता राखणे, अशी कामे त्यांना नेमून देण्यात आली आहेत.

दिवसा आणि रात्री दोन टप्प्यांत हे कर्मचारी काम करणार आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २४ तासांची सेवा बजावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. प्रेक्षक गॅलरीची सोय महापालिकेच्या वतीने गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांना बसण्याची सोय व्हावी, यासाठी कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी अधिकाधिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी मिरवणुकीने जात असतात. त्याठिकाणी स्वागत कक्ष आणि प्रेक्षक गॅलरीची सोय करण्यात आली आहे. २४ क्रेन मदतीला शहरात प्रामुख्याने कपिलेश्वर आणि कपिलतीर्थ या दोन विसर्जन तलावांत गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. यंदा मूर्तीची उंची अधिक असल्यामुळे महापालिकेने विसर्जनावेळी कोणताही अडचण होऊ नये यासाठी क्रेनची सोय केली
आहे.