बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहर आणि उपनगर मधील वडगाव, टिळकवाडी, अनगोळ, शहापूर आणि ग्रामीण भागात अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. उद्या शनिवार रोजी होणाऱ्या या मिरवणूक कार्यक्रमासाठी गुरुवार आणि शुक्रवार पासूनच धर्मवीर संभाजी महाराज चौक परिसर सजू लागला आहे. येथे विविध राजकीय पक्ष, मंडळे आणि संस्थांतर्फे श्री मूर्तीचे स्वागत मंडप उभारण्यात येत आहेत. आकर्षक सजावटीसह या मंडपांमधून श्रींचे स्वागत करण्यात येणार आहे. गणेश भक्तांनी या स्वागत मंडपांच्या उभारणीला सकाळपासूनच सुरुवात केली होती. धर्मवीर संभाजी चौक हा मिरवणुकीतील प्रमुख केंद्रबिंदू मानला जातो. शहर व परिसरातील सर्वच गणेशमूर्ती या मार्गांनी पुढे जात असल्याने भक्तांची प्रचंड गर्दी येथे लोटते. नागरिकांना मिरवणूक सुरळीत व आरामात पाहता यावी, यासाठी महापालिकतर्फे प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येते. याशिवाय चौकाभोवती सुरक्षेची काटेकोर व्यवस्था करण्यात येणार असून वाहतुकीचेही नियोजन पोलिस विभागाकडून करण्यात येणार आहे.

मिरवणुकीत विविध ढोल – ताशा पथकांसह दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन मिरवणुकीला सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक रंगत लाभणार आहे. बेळगावात उद्या शनिवारी दि. ६ गणपती विसर्जन मिरवणूक आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. गणपती विसर्जन मिरवणूक नरगुंदकर भावे चौकातून सुरू होणार असून मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, टिळक चौक, हेमुकलानी चौक, शनिमंदिरमार्गे कपिलेश्वर उड्डाणपूलवरुन कपिलेश्वर तलावात गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. मिरवणुकीदरम्यान सार्वजनिक वाहतुकीत अडथळा येऊ नये यासाठी शनिवारी दुपारी दोनपासून मिरवणूक संपेपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. मिरवणुकीच्या मार्गावरील एक पदरी व दोन पदरी रस्ते पूर्ण मिरवणुकीसाठी राखीव असतील. दुपारी २ पासून मिरवणूक संपेपर्यंत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी असणार आहे. चन्नम्मा चौक,काकतीवेस, गणपती गल्ली, नरगुंदकर भावे चौक, हुतात्मा चौक, धर्मवीर संभाजी चौक, कपिलेश्वर उड्डाणपूल तसेच कॅम्प परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहन पार्किंगला बंदी असेल. सर्व वाहनधारक आणि नागरिकांनी सहकार्य करावे. पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक कोंडी टाळावी, असे आवाहन पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे. ९ तलावांसाठी २४ क्रेन असणार आहेत. मूर्ती विसर्जन क्रेनच्या साहाय्याने होणार असल्यामुळे अधिक वेळ लागणार नाही, असा महापालिकेचा अंदाज आहे.