बेळगाव / प्रतिनिधी

जय किसान होलसेल भाजी मार्केटचा भू-वापर परवाना रद्द करण्याचा अन्यायकारक आदेश मागे घेण्यात यावा. तसेच इस्माईल मुजावर या व्यापाऱ्याच्या मृत्यू कारणीभूत असलेल्या बुडा आयुक्तांसह अन्य आठ जणांवर कारवाई केली जावी, अशी मागणी जय किसान होलसेल भाजीपाला व्यापारी संघटनेने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आणि सरकारकडे केली आहे. जय किसान होलसेल भाजी मार्केट मधील व्यापारी काल शुक्रवारी दुपारी महापौर व मनपा आयुक्तांची भेट घेण्यासाठी महापालिकेमध्ये गेले होते. त्या ठिकाणी आपली कैफियत मांडून बाहेर पडताना इस्माईल मुजावर (वय ४५, रा. वडगाव) या व्यापाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जय किसान भाजी मार्केटचा भू-वापर परवाना रद्द या आदेशाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे संतप्त झालेल्या सदर भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आज शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्या ठिकाणी जय किसान होलसेल भाजीपाला व्यापारी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना उपरोक्त मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.