- बेळगाव तालुक्यासह शहरात गणेशाचे जल्लोषी स्वागत
- ढोल – ताशांच्या गजरासह फटाक्यांची आतषबाजी
- पुढील दहा दिवस चैतन्यमय वातावरण
बेळगाव / प्रतिनिधी
काही दिवसांपासून लाडक्या बाप्पाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भक्तांची प्रतीक्षा अखेर संपली. बुधवारी पहाटेपासूनच बेळगाव तालुक्यासह शहर तसेच उपनगरात “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा” जयघोष, पारंपरिक वाद्यांचा गजर अन् फटाक्यांच्या अतिषबाजीत घरोघरी गणरायाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. सकाळी घरगुती तर सायंकाळी सार्वजनिक गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.



तत्पूर्वी बुधवारी सकाळपासूनच तालुका, शहर आणि उपनगरात घरोघरी बाप्पाला घरी आणण्यासाठी लगबग दिसून आली. तर महिलावर्ग गणरायाच्या आवडीचे मोदक, पुरणपोळी आणि पारंपारिक नैवेद्य करण्यात मग्न असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान सनई चौघड्यांसह गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले होते. परिणामी शहरातील समादेवी गल्ली, खडेबाजार, बापट गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, टिळकवाडी, शहापूर-वडगांव यासह शहराच्या विविध भागात रस्ते गर्दीने फुलून गेले होते. यावेळी बाप्पाच्या पूजेसाठी लागणारी पाच फळे आणि पूजा साहित्य आणि फटाक्यांची नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुले – हार आणि फळांचे दर वाढल्याचे दिसून आले. तरीही ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहून विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले.
यानंतर लाडक्या बाप्पाचे भक्तिमय वातावरणात जल्लोषी करून घरगुती गणेशाची प्रतिष्ठापना , शास्त्रोक्त पुजा – अर्चा आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सर्वांनी स्नेहभोजन केले.


- सार्वजनिक गणेश मूर्तींचे आगमन अन् प्रतिष्ठापना :
अलिकडे बेळगाव तालुक्यासह शहर परिसरात मुंबई आणि पुणे प्रमाणे आगमन सोहळे आयोजित केले जात आहेत. त्या अनुषंगाने शहर आणि तालुक्यातील ठराविक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश चतुर्थी पूर्वीचं दोन ते तीन दिवस आपल्या मंडळाच्या श्री मूर्ती नियोजित मंडपस्थळी नेल्या होत्या. मात्र शहर व ग्रामीण भागातील इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची सायंकाळी तीन नंतर गणेश मूर्ती नेण्यासाठी लगबग पाहायला मिळाली. त्यानंतर मूर्ती प्रतिष्ठापना व आरती करण्यात आली. भाविकांची होणारे गर्दी लक्षात घेऊन शहर ग्रामीण व पोलीस स्थानकातर्फे सर्वत्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री उशिरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्तींचे मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना केली.
एकंदरीत बुधवारपासून गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वाला अत्यंत जल्लोषात, उत्साहात आणि तितक्याच भक्तीने प्रारंभ झाला असून आता पुढील दहा दिवस हे चैतन्य असेच कायम राहणार आहे.

