- मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे जिल्हा पालकमंत्र्यांना निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
जिल्हा प्रशासनाने जनतेच्या हितासाठी आणि गणेश मंडळांच्या मागणीनुसार गणेश विसर्जनाच्या दिवशी महाप्रसाद आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे हे कौतुकास्पद आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर कोणताही भार पडणार नाही. बेळगाव मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने ठरल्याप्रमाणे महाप्रसाद सुरू ठेवण्यासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन सादर केले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन महिन्यांपासून गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू आहे. मुंबईनंतर बेळगावमधील गणेशोत्सव प्रसिद्ध आहे आणि उत्तर कर्नाटक, गोवा, कोकण आणि महाराष्ट्रातून अनेक भाविक येथे येतात. शहरातील ध.संभाजी चौक आणि बॅरिस्टर नाथ पै सर्कल, शहापूर या दोन ठिकाणी महाप्रसाद आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक भार पडणार नाही असे मध्यवर्ती गणेश महामंडळाने स्पष्ट केले आहे आणि या संदर्भात जिल्हा पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

महाप्रसादाच्या आयोजनाबाबत महापालिका बैठकीत सत्ताधारी पक्षाने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यावर निराधार आरोप केले आहेत. हे आरोप महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी गेल्या दोन महिन्यांपासून कठोर परिश्रम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न आहे. महोत्सवाचे यश जिल्हा प्रशासनाच्या निर्णयांवर अवलंबून आहे. महामंडळ सहकार्य करेल असे सांगितले.
यावेळी प्रशांत भातकांडे, विकास कलघटगी, रमाकांत कोंडुसकर, दत्ता जाधव, बळवंत शिंदोळकर, सागर पाटील, अंकुश केसरकर, स्वयंम किल्लेकर, सुमीत वंटमुरी आदी उपस्थित होते.