• महापालिका सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा
  • विरोधी गटातील नगरसेवकांनी घेतला आक्षेप

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरात फेरीवाल्यांकडून अतिरिक्त करवसुली केली जात आहे. त्याविरोधात आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी गटाच्या नगरसेवकांनी जोरदार आवाज उठवून आक्षेप घेतला आणि अतिरिक्त करवसुली करणाऱ्यांविरुद्ध महापौरांना एफआयआर नोंदवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली.

आज बेळगाव महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरुवातीला, बैठकीचे इतिवृत्त वाचून आणि मंजूर करताना, विरोधी नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यांनी पुढीलवेळी या विषयावर चर्चा करण्यास सांगितले. यावेळी, सत्ताधारी गटाचे नेते हणमंत कोंगाळी सभागृहात असले तरी, नगरसेवक रवी धोत्रे यांनी त्याला विरोध केला. यावर, विरोधी गटाचे नगरसेवक शाहिद खान पठाण, मुझ्झम्मिल डोणी आणि अझीम पटवेगार म्हणाले की यात काहीतरी लपवले जात आहे आणि ती मंजुरी घाईघाईने दिली जात आहे. यावर, सत्ताधारी गटाचे नेते हणमंत कोंगाळी यांनी आम्ही चर्चेसाठी तयार आहोत असे सांगितले.मात्र सत्ताधारी गटाचे नगरसेवक रवी धोत्रे यांनी विरोधी गटाच्या नगरसेवकांना , “तुम्ही का बोलत आहात?” तुमचे नेते कुठे आहेत? असा सवाल केला. त्यावर विरोधी नगरसेवकांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, महापालिकेतील विरोधी गटनेते सोहेल संगोळ्ळी बैठकीला अनुपस्थित असल्याचे आधीच महापौरांना सांगितले आहे. पण आमच्या नेत्यांबद्द्दल बोलणारे रवी धोत्रे कोण त्यांना तो अधिकार आहे का ? असा संतप्त सवाल केला.

यावेळी बोलताना आयुक्त शुभा बी. म्हणाल्या की, मागील बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार पॅकेज आधीच मंजूर करण्यात आले आहे. स्वच्छतेसाठी नवीन लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात त्यांच्याकडे काही सूचना असतील तर त्या ते या बैठकीत देऊ शकतात आणि पुढील बैठकीपर्यंत कार्यवाही केली जाईल.

बेळगावमधील विक्रेत्यांकडूनही जमिनीचे भाडे का वसूल केले जात आहे, असा सवाल विरोधी पक्ष सदस्य मुझम्मिल डोनी यांनी केला. यासाठी बेळगावमधील ४ ठिकाणी विक्री झोन स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. सध्या कोतवाल गल्ली आणि नरगुंदकर भावे चौक अशा दोन ठिकाणी विक्री झोन आहेत. तर आणखी दोन प्रलंबित आहेत. येथे पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर जमिनीचे भाडे माफ केले जाईल, असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी, सत्ताधारी गटनेते नेते हनुमंत कोंगाळी म्हणाले की, यासाठी निवडणुका होईपर्यंत आणि त्यांचे कामकाज होईपर्यंत जमिनीचे भाडे माफ करता येणार नाही.

विरोधी गटाचे नगरसेवक अझीम पटवेगार यांनी असा प्रश्न उपस्थित केला की, रस्त्यावरील विक्रेते आणि पालिकेच्या हद्दीतील दुकानांसाठी परवानगीपेक्षा जास्त भाडे का आकारले जात आहे? त्यांनी विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन करून मर्जीनुसार कर आकारला जात असल्याचा आरोप केला. तसेच बळजबरीने पैसे घेणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याची परवानगी महापौरांना द्यावी, गरिबांकडून दररोज १०० रुपये घेतले जाणारे भाडे त्वरित बंद करावे अशी मागणी त्यांनी केली. विधान परिषद सदस्य सायबाण्णा तलवार म्हणाके की, महापालिकेनेही प्रमुख रस्त्यांवर जमीन शुल्काबाबत फलक लावावेत किंवा नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी.

या बैठकीला उपमहापौर वाणी जोशी, महसूल उपायुक्त उदयकुमार तळवार, रेश्मा तालीकोटी, नगरसेवक, नामनिर्देशित सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.