• शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव विनय शिंदे

बेळगाव / प्रतिनिधी

सीमाभागातील विद्यार्थ्यांनी माफक शुल्कात उच्च शिक्षणासाठी विविध अभ्यासक्रमात देण्यात येणा-या सवलतींचा लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव विनय शिंदे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र यांच्यावतीने राबविण्यात येणा-या विविध अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी म. ए. समितीतर्फे सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ओरिएंटल हायस्कूल येथील तुकाराम तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे केले होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार तथा म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, शिवाजी विद्यापीठातील समन्वयक डॉ. चांगदेव बंडगर, डॉ. सचिन भोसले व मराठा समाज सुधारणा मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील होते.

डॉ. भोसले यांनी विविध अभ्यासक्रम, सर्टिफिकेट कोर्सेस, अभ्यास केंद्राची माहिती, शैक्षणिक आणि करिअर विकासाच्या संधी याबद्दल माहिती दिली. तसेच पदवी घेवू इच्छिणारे युवक-युवती स्पर्धा परिक्षेचे अभ्यासार्थी, सैनिक, नोकरदार, गृहिणी, उद्योजक, शेतकरी, कामगार या सर्वांच्यासाठी दूरशिक्षणाची माहिती सांगितली.

यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना विनय शिंदे व डॉ. बंडगर यांनी उत्तरे दिली. शिवराज पाटील यांनी स्वागत केले. यावेळी म. ए. समिती युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, बाबू कोले, श्रीकांत कदम, सुरज कुडुचकर, भाऊसाहेब कातकर, उमेश पाटील आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.