नवी दिल्ली : बेळगावला हॉकी खेळाची गौरवशाली परंपरा आहे. येथील हरवलेले हॉकीचे वैभव परत मिळवण्यासाठी युवा पिढीला प्रोत्साहित करण्याकरिता हॉकी बेळगाव सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्या अनुषंगाने बेळगाव मधील हॉकीचा दर्जा उंचावण्यासाठी सिंथेटिक एस्ट्रोटर्फ मैदानाची आवश्यकता असून सदर मैदान कॅम्प, बेळगाव येथील जीएलआर एसवाय क्र. 129 येथे विकसित करावे, अशी मागणी बेळगाव जिल्हा हॉकी संघटना अर्थात हॉकी बेळगावच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली मुक्कामी विविध खासदार, मंत्री आणि केंद्र सरकारी अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
बेळगाव मधील सिंथेटिक एस्ट्रोटर्फ हॉकी मैदानासाठी प्रयत्नशील असलेल्या हॉकी बेळगावच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली मुक्कामी नुकतीच खासदार जगदीश शेट्टर यांच्यासह केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय खेळ राज्यमंत्री रक्षाताई खडसे तसेच अन्य संबंधित खासदार, मंत्री आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली आहे.
माजी मुख्यमंत्री बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय खेळ मंत्री मनसूक मांडवीय यांना एस्ट्रोटर्फ मैदानाला निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव दिला आहे. शेट्टर यांच्यासह मागणीचे निवेदन त्यांनी मंत्री, खासदारांना निवेदन सादर केले. त्यानंतर या शिष्टमंडळाने केंद्रीय योजना खेळ खात्याचे अतिरिक्त सचिव अधीर रंजन राव, हर्षित जैन आदींच्याही भेटी घेतल्या. त्यावेळी त्यांनाही निवेदन सादर करून एस्ट्रोटर्फ मैदानाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, सदस्य सागर पाटील, प्रकाश बेळगोजी आदींचा उपरोक्त शिष्टमंडळात समावेश होता. या सर्वांनी बेळगाव शहरात मैदान व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
बेळगाव हे हॉकी खेळासाठी प्रसिद्ध असून हॉकी खेळ बेळगावकरांच्या वंशावळीत आहे. बेळगावने आजपर्यंत ऑलंपियन बंडू पाटील, शांताराम जाधव, शंकर लक्ष्मण या दिग्गज हॉकीपटूंसह मोठ्या संख्येने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण केले आहेत. बेळगावमध्ये पूर्वी हॉकी कर्नाटकशी संलग्न पुरुष आणि महिला अशा दोन्ही हाॅकी संघटना होत्या. सध्या हॉकी बेळगाव संघटना बेळगावचे हरवलेले वैभव परत मिळवण्यासाठी जिल्ह्यातील तरुण पिढीला हॉकी खेळात पारंगत करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तथापि बेळगावमध्ये हॉकीचा दर्जा उंचावण्यासाठी शहरात अॅस्ट्रोटर्फ मैदानाची आवश्यकता आहे.
त्यासाठी कॅम्प परिसरात असलेली जीएलआर एसवाय. क्र. 129 ही जागा अनुकूल असून त्यासाठी आपण सहकार्य करावे. हॉकी बेळगावशी सहकार्य करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पत्र संदर्भासाठी जोडले आहे. बेळगावच्या खेळाडूंना सराव करण्यासाठी आणि अत्याधुनिक मैदानी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, एस्ट्रोटर्फ मैदान इतर सुविधांसह बांधण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी अशी आपल्याला मनापासून विनंती आहे. आम्ही मुला आणि मुलींसाठी नियमितपणे आंतरशालेय, महाविद्यालयीन आणि जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करत असतो.
आम्ही अखिल भारतीय स्तरावरील निमंत्रण स्पर्धा देखील आयोजित केल्या आहेत. ही स्पर्धा बेळगावमधील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मेजर सय्यद मैदान आणि लेले मैदानावर आयोजित केली जाते. ही दोन्ही लाल मातीचे कठीण मैदान आहेत. तथापी सध्या हॉकी जवळजवळ संपूर्ण देशात आणि जगभरात सिंथेटिक पृष्ठभागाच्या मैदानावर खेळली जाते. या पद्धतीच्या मैदानाच्या सुविधेचा अभाव असल्यामुळे आमची मुले आणि मुली नियमितपणे सिंथेटिक ग्रास टर्फ किंवा अॅस्ट्रोटर्फ मैदानावर खेळणाऱ्या संघांशी स्पर्धा करू शकत नाहीत. तेव्हा बेळगावातील हॉकीचा दर्जा उंचावण्यासाठी सुचवलेल्या जागेत सिंथेटिक ऍस्ट्रोटर्फ हॉकी मैदान विकसित करावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. दरम्यान, या संदर्भात खासदार जगदीश शेट्टर यांनी यासाठी केंद्रीय खेळ मंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र लिहिले आहे. याशिवाय कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडे सदर मैदानासाठी शिफारस केली आहे.