बेळगाव / प्रतिनिधी

गौंडवाड येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील यांच्या खून प्रकरणी पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर उर्वरित चार जणांना एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. के. गंगाधर यांनी हा निकाल दिला. शनिवारी सायंकाळी चार वाजता सर्व आरोपींना न्यायालयात हजर करत ही शिक्षा सुनावण्यात आली.

या खून प्रकरणात बेळगाव जिल्ह्यातील गौंडवाड येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश राजेंद्र पाटील (वय ४०) यांचा १८ जून २०२२ रोजी जांबीयाने भोसकून खून करण्यात आला होता. भैरवनाथ मंदिराच्या जागेवरून झालेल्या वादामुळे ही घटना घडली होती. या प्रकरणी एकूण १० जणांना दोषी ठरवण्यात आले होते, त्यापैकी ५ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ज्या पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यात आनंद रामा कुट्रे (वय ५५), अर्णव आनंद कुट्रे (वय ३२), जायाप्पा भैरु निलजकर (वय ५०), महांतेश जायाप्पा निलजकर (वय ३५) आणि शशिकला आनंद कुट्रे (वय ५०) यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींवर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला होता. याशिवाय, न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा झालेल्या पाच जणांना १३ लाखांहून अधिक दंड ठोठावला आहे. त्यापैकी १० लाख रुपये मयताच्या पत्नीला, तर उर्वरित दंड त्याच्या आईला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे, अशी माहिती वकील शामसुंदर पत्तार यांनी माध्यमांना दिली. प्रकरणात फिर्यादीच्या वतीने ॲड. शामसुंदर पत्तार आणि सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. जी. के. माहूरकर यांनी काम पाहिले.