निपाणी / प्रतिनिधी

निपाणी शहर व परिसरात गेले 15 दिवस अधूनमधून रिपरिप असणाऱ्या पावसाचा गेल्या दोन दिवसांपासून जोर वाढला आहे. तसेच धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस कोसळत असल्याने दूधगंगा आणि वेदगंगा नदीची पाणीपातळी पुन्हा वाढली आहे. परिणामी तालुक्यातील 8 पैकी 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. याठिकाणची वाहतूक बंद होऊन पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

सध्या तालुक्यातील बेडकीहाळ – शिरदवाड आणि कुन्नूर-मांगूर वगळता अन्य सर्व सहा बंधाऱ्यांवरील वाहतूक बंद झाली आहे. गेल्या 24 तासांत निपाणी परिसरात 25 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली तरी काळम्मावाडी धरण क्षेत्रात 90 मिलिमीटर तर पाटगाव धरण क्षेत्रात 130 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे वेदगंगा आणि दूधगंगा नद्यांच्या पातळीत गतीने वाढ होत आहे. काळम्मावाडी धरणात 25.49 पैकी 22.61 म्हणजेच 89 टक्के पाणीसाठा आहे तर पाटगाव धरण 100 टक्के भरले आहे. या दोन्ही धरणातून अनुक्रमे 1600 व 400 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

गेल्या चार दिवसांत पावसाचा जोर वाढला असला तरी सध्या पूरस्थितीची शक्यता नाही. नद्यांमध्ये 40 हजार क्युसेकने आवक वाढल्यास ती धोकादायक पातळी ठरते. सध्या यमगर्णी येथे वेदगंगा नदीत 5 हजार 851 क्युसेक तर कोगनोळीनजीक दूधगंगा नदीत 6 हजार 821 क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे निपाणी तालुक्यात नदीकाठच्या भागाला सध्या तरी धोकादायक परिस्थिती नसली तरी नद्यांच्या वाढत्या पातळीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना तहसीलदार एम. एन. बळीगार यांनी केल्या आहेत.

  • पावसाची पाच नक्षत्रे पूर्ण :   

यंदाच्या पावसाळ्यातील पाच नक्षत्रे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. शनिवार 16 ऑगस्टपासून आश्लेषा नक्षत्र पूर्ण होऊन मघा नक्षत्राला सुरुवात झाली आहे. दरवर्षी आश्लेषा नक्षत्रात आसळकाचा पाऊस अधिक प्रमाणात होतो. या काळातच पूरस्थिती उद्भवते. मात्र यंदा पावसाने अधूनमधून रिमझिम अशी हजेरी या नक्षत्रात लावली. यामुळे सोयाबीन, भुईमूग आदी पिकांची वाढ खुंटली आहे.

  • साथीचे आजार वाढले : 

गेल्या पंधरा दिवसात ऊन, पाऊस, ढगाळ वातावरण असे मिश्र हवामान असल्याने साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. थंडी, ताप, सर्दी डोकेदुखी, घसा, अंगदुखी या आजारांचे रुग्ण वाढले अहेत. सून उपचार घेण्यासाठी दवाखान्यांमध्ये गर्दी वाढली आहे. अशावेळी पाणी उकळून पिण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ञांकडून केले जात आहे.

  • निपाणी तालुक्यातील बंधारे व पुलांची स्थिती : 
  • कारदगा – भोज – वाहतूक बंद
  • भोजवाडी – कुन्नूर – वाहतूक बंद
  • सिदनाळ – अकोळ – वाहतूक बंद
  • जत्राट – भिवशी वाहतूक बंद
  • हुन्नरगी – ममदापूर – वाहतूक बंद
  • कुन्नूर – बारवाड – वाहतूक बंद