• जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन 

बेळगाव / प्रतिनिधी

संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील जलाशयांमधून पाणी सोडण्याबाबत आम्ही तेथील अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहोत, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

मंगळवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, गेल्या गेल्या दोन दिवसांपासून बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळी जिल्हा पंचायत कार्यालयात जि. पं. सीईओ आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांसोबत बैठक झाली आहे .सोमवारी सायंकाळी महाराष्ट्रातील कोयना जलाशयातून ५३ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले असून ते आपल्या जिल्ह्यात पोहोचण्यासाठी पुरेसे नाही. त्यासाठी ४० तास लागतील. जर २ लाख क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग झाला तर कृष्णा नदीला पूर येईल. तेव्हा बेळगाव जिल्ह्यात परिस्थिती उद्भवू शकते. सध्या कृष्णा खोऱ्यात पुराचा धोका नाही, असे त्यांनी सांगितले.

आमदार, जिल्हा पालकमंत्री यांना आम्ही माहिती दिली आहे. आज सकाळपासून अलमट्टी जलाशयातून दीड लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. कल्लोळ पुलाजवळ कृष्णा नदीतून ९३ हजार क्युसेक पाणी वाहत आहे.जिल्हा तहसीलदारांना आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश आधीच देण्यात आले आहेत. ते पुरग्रस्त केंद्रांची ओळख पटवण्यात आणि इतर कामात व्यस्त आहेत. लोळसुर पुलाजवळ घटप्रभा नदीत ४३ हजार क्युसेक पाणी वाहत आहे. तर गोकाक शहराच्या काही भागात ५३ हजार क्युसेकपेक्षा जास्त पाणी वाहत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत लोकांना आगाऊ सूचना देण्याचे निर्देश गोकाक तहसीलदारांना देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले.