- सखल भागात पाणी : शहर गारठले
- नदी – नाले पुन्हा दुथडी भरून वाहू लागले
- राकसकोप जलाशयातून पाण्याचा विसर्ग
- मार्कंडेय नदीला पूर आल्याने शेती पाण्याखाली
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरासह उपनगरात व ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नदी – नाले पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागले आहेत. सोमवारी दिवसभर संततधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने शहर गारठले आहे. तर सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जोरदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाचे दोन दरवाजे ९ इंचाने उघडण्यात आले आहेत. तीन दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मार्कंडेय नदीला पूर आला आहे. परिणामी दुसऱ्यांदा मार्कंडेय नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे. याशिवाय अन्य जलाशयांच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झाली आहे.
१६ ऑगस्ट पासून मघा नक्षत्राला सुरुवात झाली आहे. नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विशेष करून रविवारी रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे खानापूर सह काही तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याने खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुटी जाहीर केली आहे. तसेच असाच पाऊस सुरू राहिल्यास पुन्हा पूर परिस्थितीला सामोरे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संभाव्य धोका ओळखून जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची क्षमता २४७८ फूट इतकी आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची संतदार कायम असल्याने जलाशयात पाण्याची आवक वाढत चालली आहे. त्यामुळे शनिवारी धरणाचे क्र. २ आणि ५ असे दोन दरवाजे पाच इंचांनी उघडण्यात आले होते. रविवारी परत दोन इंचांनी तर सोमवारी सकाळी आणखी दोन इंचांनी दरवाजे उघडण्यात आले. एकूण नऊ इंचांनी पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मार्कंडेय नदीला पूर आला आहे परिणामी नदीकाठची शेती दुसऱ्यांदा पाण्याखाली गेली आहे. यापूर्वी पाण्याखाली गेलेले भात पीक खराब झाल्याने शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा लागवड केली होती. पुन्हा शेती पुराच्या पाण्याखाली गेल्याने भात पीक खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी चार दिवस पाऊस आहे. एन गणेशोत्सवाच्या तोंडावरच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने गणेश भक्तांमधून मात्र नाराजी व्यक्त होत आहे.
- वातावरणात प्रचंड गारठा :
पावसाची रिपरिप कायम असल्याने वातावरणात प्रचंड गारठा निर्माण झाला आहे. शहरासह ग्रामीण भागात थंडवारे वाहू लागले आहेत. पावसासह थंडीच्या लाटेमुळे नागरिक घराबाहेर पडले नाहीत. तसेच वातावरणात अचानक बदल झाल्याने रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. संत दार पाऊस सुरू असल्याने ऐन गणेशोत्सवात बाजारपेठेवर याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. रविवारी आणि सोमवारी बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी रोडावल्याचे दिसून आले.