बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या संगीत भजन स्पर्धेस रविवारी दुपारी मराठा मंदिर येथे प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या भजन स्पर्धेत एकंदर ३१ संघानी भाग घेतला असून त्यामध्ये बेळगाव शहर, बेळगाव तालुका आणि चंदगड तालुका येथील भजनी मंडळे आहेत.

रविवारी दुपारी ह. भ. प. दत्तू जट्टेवाडकर यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून भजन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “भजनाची सुरुवात ही हजारो वर्षांपूर्वी झाली. संत कवी नरसी मेहता, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, मिराबाई, कबीर, सूरदास अशा अनेक संतांनी भक्तीच्या माध्यमातून सामान्य जनतेला परस्परांशी जोडण्याचा सोपा मार्ग दिला.वारकरी संप्रदायात या संत मंडळींनी आपल्याला आत्मिक उन्नतीचा मार्ग दाखविला. भजन ही फक्त गाणी नव्हेत तर ती एक साधना आहे भक्तीची अनुभूती आहे” असेही ते म्हणाले.

दत्तू जट्टेवाडकर यांच्यासह वाचनालयाचे जेष्ठ सदस्य ॲड. आय.जी. मुचंडी व अभय याळगी यांच्याहस्ते श्री विठ्ठल, संत तुकाराम, ज्ञानेश्वर व नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अनंत लाड यांच्याहस्ते पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड यांच्याहस्ते स्पर्धेचे परीक्षक श्रीकांत सुळेभावकर (कागणी) आणि बाबुराव सावंत (आजरा) यांचा सन्मान करण्यात आला. वाचनालयाचे सदस्य प्रसन्न हेरेकर यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन कार्यवाह सुनीता मोहिते यांनी केले. प्रारंभी स्व. गोविंदराव राऊत यांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. सुरुवातीस कालिकादेवी महिला भजनी मंडळ, बापट गल्ली यांनी मंगळागौर सादर केली. त्यानंतर एकूण तेरा भजनी मंडळानी आपली कला सादर केली.

  • सोमवारची भजने :

सोमवारी दुपारी दोन वाजता या भजन स्पर्धेला प्रारंभ होणार असून त्यामध्ये,

  1.  ओमकार महिला भजनी मंडळ, हनुमान नगर
  2.  श्री. दुर्गामाता महिला भजनी मंडळ, बैलूर
  3.   श्री. जिव्हेश्वर महिला भजनी मंडळ,वडगाव
  4.  श्री. पंचराशी महिला भजनी मंडळ, राकसकोप
  5.   श्री. विठ्ठल रखुमाई महिला भजनी मंडळ, कंग्राळी खुर्द
  6.  सद्गुरु भजनी मंडळ, भाग्यनगर
  7.   ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळ राजवाडा कंपाउंड, वडगाव या महिला गटाबरोबरच 
  8. श्रीहरी भजनी मंडळ, इनाम बडस 
  9. श्री. रवळनाथ भजनी मंडळ,अडकूर 
  10. श्री. मरगुबाई भजनी मंडळ, माणगाव 
  11. ज्ञानेश्वर माऊली संगीत भजनी मंडळ, निडगल 
  12. श्री. धन्य ते माता पिता भजनी मंडळ, बाकनूर
  13. जय हनुमान कलाप्रेमी भजनी मंडळ, करंजगाव

या गटातील मंडळांची भजने सादर होणार आहेत. रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे. याप्रसंगी वाचनालयाचे सर्व संचालक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.