- बेळगावलाही फटका
- प्रवाशांचे हाल ; अनेकांकडून खासगी वाहनांचा अवलंब
बेळगाव / प्रतिनिधी
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही, केएसआरटीसी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संप सुरू केला आहे. बेळगाव शहरातही संपाचा परिणाम झाला असून बहुतेक कर्मचाऱ्यांनी आज कामाला दांडी मारणेच पसंत केले आहे. दुसरीकडे संपामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.बसेसविना अनेक प्रवाशांवर सकाळपासून मध्यवर्ती बस स्थानकावर ताटकळत थांबण्याची वेळ आली आहे.
नियमित बससेवेमध्ये बेळगाव विभागात दररोज ७०० तर चिक्कोडी विभागात ६६८ बसेस धावतात, दोन्ही विभागात दररोज ४३०० हून अधिक कर्मचारी काम करतात. मात्र संपामुळे आतापर्यंत आगारामधून एकही बस बाहेर पडलेली नाही. फक्त लांब पल्ल्याच्या शहरांमधून येणाऱ्या बसेस बसस्थानकावर आल्या आहेत.
परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मार्केट पोलिस बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात दाखल झाले आहेत. मार्केट पोलीस स्थानकातील एक सीपीआय आणि तीन पीएसआयसह कर्मचारी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बस सेवांवर लक्ष ठेवून आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे आणि पोलीस उपायुक्त एन. व्ही. बरमणी सहकाऱ्यांच्या मदतीने मध्यवर्ती बस स्थानकावरील प्रवाशांना खाजगी बसेस आणि इतर वाहनांद्वारे त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था करत आहेत.
एकंदरीत या संपामुळे जिल्ह्यातील बससेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी नियोजितस्थळी पोहोचण्यासाठी अनेकजण खासगी वाहनांचा अवलंब करताना दिसत आहेत.