- पोलिस आयुक्त भूषण बोरसे
- खडेबाजार विभागातील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील गणेश मंडळांना पोलिस आयुक्तालयात १ ऑगस्टपासून दुपारी चार ते रात्री आठपर्यंत एक खिडकी योजना सुरु करण्यात येणार आहे. सर्व मंडळांसाठी एकाच ठिकाणी सोय केली आहे. या ठिकाणी हेस्कॉम, अग्निशमन दल, महापालिका कर्मचारी उपस्थित असणार आहेत. त्याचा शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले.
खडेबाजार एसीपी कार्यालयात खडेबाजार व कॅम्प पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी (दि. २९) झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी यांनी पाटील गल्ली भगतसिंग चौकात मराठी फलक उभारल्यानंतर सोशल मीडियावरून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावर पोलिस आयुक्त बोरसे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पोलिस उपायुक्त नारायण बरमनी यांनीही उपस्थित प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन केले.
यावेळी पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी शहर उपनगरात गणेशोत्सव शांततेत कसा साजरा होईल, याकडे सर्व मंडळांनी लक्ष देणे आवश्यक आहे. काळात मंडळांनी पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. मंडळांच्या सर्व अडचणी तत्काळ मार्गी लावल्या जातील, अशी ग्वाही दिली.
बैठकीला माजी महापौर सतीश गौरगोंडा, परेश शिंदे, किशोर खोकले, अरविंद केसरकर यांच्यासह खडेबाजार व कॅम्प पोलिस ठाण्यातील सर्व सार्वजनिक उत्सव मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
- एक महिन्याआधीच बैठका :
गणेशोत्सव आठ दिवसांवर येऊन ठेपल्यानंतर पोलिस विभागातर्फे गणेशोत्सव मंडळाच्या बैठक होत असत. यंदा पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी ही परंपरा मोडीत काढली. गणेशोत्सवाच्या एक महिना आधीच सार्वजनिक मंडळाच्या बैठक आयोजित केली जात आहे. त्यामुळे नियोजनास अधिक वेळ मिळत असल्याची चर्चा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.