• राजकीय भवितव्य सुनावणीवर अवलंबून

बेळगाव / प्रतिनिधी

महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव यांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी बेंगळूर उच्च न्यायालयात सोमवार दि. २८ रोजी होणार आहे. ही सुनावणी अत्यंत महत्त्वपूर्ण असून या सुनावणींवर महापौर व नगरसेवकांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

खाऊकट्टा प्रकरणी बेळगावचे प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टण्णावर यांनी महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांना अपात्र ठरविले आहे. त्यांनी या विरोधात नगरविकास खात्याच्या सचिव दीपा चोळण यांच्याकडे दाद मागितली होती. मात्र, त्यांनीही दोघांना अपात्र ठरविले आहे. जून महिन्याच्या अखेरीस हा निर्णय झाला होता. त्यानंतर दोघांनीही दीपा चोळण यांच्या निर्णयाला बेंगळूर उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने चोळण यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यापूर्वी ७ जुलै रोजी सुनावणी झाली. त्यावेळी तक्रारदार सुजित मुळगुंद यांच्यातर्फे ॲड. नितीन बोलबंडी यांनी लेखी हरकत दाखल केली आहे. सरकार आणि दोन्ही नगरसेवकांनी आपले म्हणणे मांडण्यास वेळ मागितल्याने उच्च न्यायालयाने सदर सुनावणी २८ जुलै रोजी निश्चित केली आहे. त्यामुळे आज होणारी सुनावणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. न्यायालयात याचिकाकर्ते आणि प्रतिवादींच्या वकिलात जोरदार युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. नगरसेवक प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचल्याने प्रादेशिक आयुक्तांनी स्थायी समिती निवडणूक लांबणीवर टाकली आहे. आजच्या सुनावणीनंतर स्थायी समितीचा मार्ग देखील मोकळा होण्याची शक्यता आहे.