• मूर्तीकामालाही वेग ; मूर्तिकार करताहेत दिवसरात्र काम

बेळगाव / प्रतिनिधी

गणेश ही विद्येची आणि संकटांचे निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. एखाद्या महत्कार्याच्या आरंभी ‘ श्री गणेशाय नम: ‘ म्हणून त्याची आराधना करण्याची प्रथा आहे.त्याचप्रमाणे अध्ययनाच्या आरंभीही गणेशाचा नामोच्चार करतात. गणपतीची पूजा केल्याने घरात समृद्धी येते म्हणून हिंदू धर्मात भगवान गणेश सर्वप्रथम पूजनीय देवता आहे.

दरम्यान यंदाचा गणेशोत्सव समीप आला आहे. या अनुषंगाने बेळगावमधील विविध मूर्तीशाळांना भेट दिली असता मूर्तिकार दिवसरात्र काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

या वर्षीचा गणेशोत्सव बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. मूर्तिकार गणेशमूर्ती बनवण्याचे आणि त्या वेळेवर पोहोचवण्याचे आव्हान स्वीकारत आहेत. दरवर्षी गणेशोत्सवाच्या अनेक महिने आधीपासून मूर्ती बनवण्याचे काम सुरू केले जाते. मूर्ती बनवण्यापासून ते त्यांना अंतिम आकार देण्यापर्यंत अनेक पद्धती आहेत. मूर्ती माती, शाडू माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवल्या जातात. अलिकडच्या काळात, पर्यावरणाविषयी वाढत्या जागरूकतेमुळे, शाडू माती आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्तींच्या मागणीत विशेष वाढ झाली आहे. या मागणीनुसार, मूर्ती बनवणारे देखील पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यावर भर देत आहेत.

यानिमित्ताने शहरातील विविध मूर्तीशाळांना भेट देऊन मूर्तिकारांच्या प्रतिक्रया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, मूर्तिकार अशोक पाटील म्हणाले, ” गणेशमूर्ती साकारणारी आमची ही तिसरी पिढी आहे आणि दरवर्षी १,००० ते १,२०० मूर्ती बनवल्या जातात. आम्ही विविध स्वरूपात सुमारे ६० ते ७० प्रकारच्या आकर्षक घरगुती गणेश मूर्ती बनवतो. आम्ही शाडू माती आणि पीओपीपासून मूर्ती बनवतो. मूर्ती बनवण्याचे काम दसऱ्यानंतर सुरू होते. बाजारात कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे मूर्तींच्या किमती वाढल्या आहेत.”

मूर्तीकार मोहन पांडुरंग जाधव म्हणाले, “उत्सव हे परंपरा आणि एकतेचे प्रतीक आहेत आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार गणेश चतुर्थी साजरी केली पाहिजे. बापट गल्ली आणि तानाजी गल्ली येथील आमच्या मूर्तीशाळांमध्ये पारंपारिक तंत्रांचा वापर करून ग्राहकांच्या मागणीनुसार शाडू, पीओपी आणि इतर मूर्ती बनवल्या जात आहेत. मागील पिढी आणि आताची पिढी यांच्या मागणीत अनेक बदल झाले आहेत. पारंपारिक मूर्तींपेक्षा सोशल मीडियावर दिसणाऱ्या मूर्तींकडे ग्राहक अधिक आकर्षित होत असल्याने या व्यवसायाला फटका बसला आहे.”

गणेश चतुर्थीच्या काही दिवस आधी कामाचा जोर वाढतो. मूर्तींची वाहतूक करणे, त्या योग्यरित्या पॅक करणे आणि त्या वेळेवर भाविकांपर्यंत पोहोचवणे ही देखील मूर्तीकारांची प्रमुख कामे आहेत. अनेक मूर्तीकारांना वाढती महागाई, कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि कुशल कामगारांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. पण मूर्तीकारांच्या या प्रचंड प्रयत्नातूनच भाविकांना गणेश चतुर्थीचा खरा आनंद आणि रंग अनुभवायला मिळतो, हेही तितकेच खरे आहे.