• पंधरा दिवस आधी प्रारंभ : पोलिस आयुक्तांची माहिती

बेळगाव : शहर आणि उपनगरांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी गणेशोत्सवाच्या पंधरा दिवस अगोदर विविध ठिकाणी ‘एक खिडकी’ सुरू केली जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पोलिस आयुक कार्यालयात बैठक झाली. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, शहरात गणेशोत्सव मंडळांची संख्या अधिक प्रमाणात आहे. यासर्व मंडळांना विविध प्रकारची परवानगी घ्यावी लागते. मात्र, परवानगी देण्यासाठी एक खिडकी सुरू करण्यास विलंब केला जातो. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांची ऐनवेळी धावपळ होते. त्यामुळे उत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी विविध प्रकारची परवानगी देण्यासाठी एकाच ठिकाणी विविध खात्याच्या कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची नेमणूक करावी तसेच महामंडळ आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मांडल्या जाणाऱ्या सूचनांचा विचार करावा. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील.

शहरात आगमन सोहळा आणि इतर कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. तसेच विसर्जनासाठी काही मोजक्या विसर्जन तलावांवर अधिक गर्दी होते. त्यामुळे आगमन सोहळा वाहतूक कोंडी होणार नाही याची दखल घ्यावी असे सांगितले.

लोकमान्य गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, शहापूरचे अध्यक्ष नेताजी जाधव, विकास कलघटगी, रणजीत चव्हाण पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला माजी नगरसेवक रमेश सौंटक्की, राजू खटावकर, रोहित रावळ, अशोक चिंडक, पोलिस उपायुक्त नारायण बरमनी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.